महत्वाच्या बातम्या

 भाड्याने घेतलेली बोलेरो विकली : नंबर प्लेट बदलून फसवणूक, दोघे अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भाड्याने चालविण्यासाठी दिलेली बोलेरो गाडी परस्पर विकून तिची नंबर प्लेट बदलल्याचा धक्कादायक प्रकार बल्लारपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी छत्तीसगडमधील वाहनमालक अरबाज लतीफ शेख वय २७ यांच्या तक्रारीवरून विजय वर्मा, अयुब खान उर्फ नवाब तुराप खान आणि जिया खान यांच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत अयुब खान उर्फ नवाब तुराप खान आणि जिया खान यांना अटक केली असून, मुख्य आरोपी विजय वर्मा याचा शोध सुरू आहे.

तक्रारीनुसार, अरबाज शेख यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये छत्तीसगडमध्ये सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांना सेकंड हँड बोलेरो क्रं. सीजी १८ एल ८२३० खरेदी केली होती. आर्थिक अडचणीमुळे वाहनाला पुरेशी बुकिंग मिळत नसल्याने त्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये बल्लारपूर येथील विजय वर्मा याला दरमहा २० हजार रुपये भाड्याने चालविण्यासाठी वाहन दिले होते. त्यावेळी ५० हजार रुपये आगाऊ घेण्यात आले होते. परिचयातील व्यक्ती असल्याने कोणताही लेखी करार करण्यात आला नव्हता.

यानंतर विजय वर्मा याने वाहनाचे भाडे देण्यास नकार देत गाडीच्या दुरुस्तीसाठी १ लाख ५० हजार रुपये खर्च झाल्याचा दावा केला आणि ती रक्कम दिल्याशिवाय वाहन परत मिळणार नसल्याचे सांगितले. मे २०२६ मध्ये अरबाज शेख स्वतः बल्लारपूर येथे गाडी परत घेण्यासाठी आले असता, त्यांनाही वाहन दाखविण्यात आले नाही.

दरम्यान, नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय वर्मा याने ती बोलेरो अयुब खान उर्फ नवाब तुराप खान याला विकल्याचे समोर आले. तसेच वाहनाची नंबर प्लेट बदलून ती वापरली जात असल्याची माहितीही मिळाली. यानंतर अरबाज शेख यांनी चंद्रपूरमध्ये येऊन वाहनाचा शोध सुरू केला.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अयुब खान याचा मुलगा जिया खान याच्याकडे वाहनाबाबत विचारणा केली असता, त्याने गाडी परत मिळणार नाही, पुन्हा येथे आलास तर घरी परत जाऊ शकणार नाहीस, अशी धमकी दिली.

२७ जुलै २०२६ रोजी बुध्द नगर वार्डातील गौसिया मशिदीजवळ उभी असलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो संशयास्पद असल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदाराने तेथे जाऊन पाहणी केली. त्या वाहनावर एमएच ४० वाय ६२७४ क्रमांकाची नंबर प्लेट लावलेली होती. मात्र चेसिस क्रमांक तपासल्यानंतर ती स्वतःचीच बोलेरो असल्याची खात्री झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे विजय वर्मा, अयुब खान उर्फ नवाब तुराप खान आणि जिया खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी अयुब खान उर्फ नवाब तुराप खान आणि जिया खान यांना अटक केली असून, मुख्य आरोपी विजय वर्मा अद्याप फरार आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव चव्हाण करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos