मूल पोलिसांची धडक कारवाई : कत्तलीसाठी नेला जाणारा ३८ गोवंशांसह ट्रक जप्त, रु.१३.२६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत ३८ गोवंशीय जनावरांनी भरलेला टाटा आयशर ट्रक जप्त केला. या कारवाईत सुमारे १३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वाहनचालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे हे अंमलदारांसह गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे सीजी-०४-पीएम-३३७७ क्रमांकाच्या टाटा आयशर वाहनातून चंद्रपूर मार्गे गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे फाटक परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पळ काढला. पाठलाग केल्यानंतर वाहन मिळून आले, मात्र चालक घटनास्थळावरून फरार झाला.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ३८ गोवंशीय जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने दाटीवाटीने बांधून, चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कोंबून भरलेली असल्याचे आढळले. यापैकी तीन जनावरे मृत अवस्थेत आढळून आली. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून जिवंत जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तर मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले.
या कारवाईत १० लाख रुपये किमतीचा टाटा आयशर ट्रक व सुमारे ३ लाख २६ हजार रुपये किमतीची गोवंशीय जनावरे असा एकूण १३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८१ व ३२५, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ मधील कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(अ), (ड), (ई) व (एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे तसेच पोलीस अंमलदार नरेंद्र वाकडे यांनी केली असून, पुढील तपास मूल पोलीस स्टेशन करीत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




