सोयाबीन उगवलेच नाही : १७ शेतकऱ्यांची फसवणूक

- बनावट बियाणे प्रकरणी कंपनीसह पुरवठादारावर गुन्हा, दुबार पेरणीचे संकट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पेरणीनंतरही सोयाबीनची उगवण न झाल्याने कान्सा व शिरपूर येथील १७ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले असून, त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाने केलेल्या तपासणीत संबंधित बियाणे संशयास्पद व निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बियाणे पुरवठादार आणि संबंधित कंपनीविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात गुरुवारी २३ गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पिकांचा मौका पंचनामा करून नमुने तपासण्यात आले. तपास अहवालानंतर गुणनियंत्रक निरीक्षकांच्या फिर्यादीवरून संभाजीनगर येथील बियाणे पुरवठादार राहुल रामभाऊ उर्मी तसेच बुस्टर प्लॅन्ट जेनेरिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी पावसाच्या अनुकूल वातावरणात मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, बियाण्यांची उगवणच न झाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बियाणे, मशागत, मजुरी आणि इतर खर्चाचा दुहेरी आर्थिक बोजा शेतकऱ्यांवर पडला असून, खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कृषी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह -
या प्रकरणात कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना संबंधित माहिती देण्याबाबत काही अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे.
या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी गुणनियंत्रक निरीक्षक प्रफुल आडकिने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले जाते. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्यास सांगूनही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याची तसेच त्यांचा मोबाईल बंद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, कृषी विभागाने या प्रकरणात अधिकृत तक्रार दाखल केली असून, प्राथमिक तपासाअंती बियाणे पुरवठादार आणि संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
बनावट किंवा निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी बियाण्यांच्या गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




