शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गट शेती व कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

- बोरी कोकाटे येथे बळीराजा सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय कृषी कार्यशाळेचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पारंपरिक शेतीसोबतच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामूहिक गट शेती, कृषी प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धित उत्पादनांकडे वळावे. यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे येथे नावीन्यपूर्ण प्रयोग करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित बळीराजा सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय कार्यशाळेत पालकमंत्री बोलत होते. याच कार्यक्रमात पाटबंधारे विभागाच्या वतीने बोर आणि धाम प्रकल्पांवरील कालव्यांच्या वितरण प्रणालीच्या दुरुस्ती व नूतनीकरण कामाचे भूमिपूजनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. मनिषा कायंदे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नितू चव्हाण, तहसीलदार शकुंतला पाराजे, राजेश सराफ, अशोक कलोडे, अशोक मुडे, सहाय्यक अभियंता सतीश मोवाडे, घोराडच्या माजी सरपंच ज्योती घंगारे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी सक्षम झाल्याशिवाय आधुनिक भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही -
यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय आधुनिक भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. शेतकरी आत्मनिर्भर आणि समृद्ध व्हावा यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.
शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, बळीराजा पांदन रस्ते योजना, बळीराजा मोफत वीज योजना तसेच विविध अनुदान योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतीचा विकास, उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत फळशेती, भाजीपाला लागवड, प्रक्रिया उद्योग आणि नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. त्यांच्या या कामाची राज्यस्तरावर दखल घेऊन सन्मान करण्यात आला आहे. इतर शेतकऱ्यांनीही या प्रयोगांचे अनुकरण करून शेतीत बदल घडवून आणावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
गट शेती आणि प्रक्रिया उद्योगातून वाढेल उत्पन्न -
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सोपे होईल. तसेच कृषी प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास शेतीमालाला योग्य मूल्य मिळून उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात नावीन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. फळशेती, भाजीपाला उत्पादन, आधुनिक शेती पद्धती आणि कृषीपूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
बोर व धाम प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीच्या दुरुस्ती व नूतनीकरणामुळे सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळणार असून, शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील कृषी विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
News - Wardha




Petrol Price




