जिल्ह्यात कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश : २० जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या नक्षल शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१) व ३७(३) अन्वये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. हा आदेश २० जुलै २०२६ रोजी पहाटे १२.०१ वाजल्यापासून ते ३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नक्षल शहीद सप्ताहादरम्यान माओवादी संघटनांकडून पोलीस पथके व पोलीस ठाण्यांवर हल्ले करून शस्त्रे व दारुगोळा लुटण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तसेच सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान, दूरध्वनी टॉवरची जाळपोळ, प्रमुख धरणे व विद्युत निर्मिती प्रकल्पांचे नुकसान, रेल्वे प्रशासनाला लक्ष्य करून अनुचित घटना घडविणे, पोलीस गुप्त बातमीदारांवर हल्ले तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचे अपहरण करण्याचाही धोका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
याशिवाय विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
विविध वस्तू बाळगण्यास बंदी -
जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणतेही दाहक अथवा स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे तसेच ती फेकण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे किंवा साधने तयार करणे, जमा करणे अथवा बाळगण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
याशिवाय व्यक्ती, प्रेत किंवा त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, सभ्यता किंवा नीतिमत्तेला धक्का पोहोचेल अथवा राज्याच्या सुरक्षिततेस बाधा निर्माण होईल, अशा प्रकारची चिथावणीखोर भाषणे करणे, हावभाव किंवा सोंग आणणे तसेच अशा प्रकारची चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर साहित्य तयार करून त्याचे प्रदर्शन अथवा जनतेमध्ये प्रसार करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पूर्वपरवानगीशिवाय मिरवणुका व कार्यक्रमांना बंदी -
मनाई आदेशानुसार उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही. तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर अथवा सार्वजनिक चावडीवर एकत्र जमण्यास आणि कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे की, हा आदेश २० जुलै ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू राहील. नागरिकांनी आदेशाचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




