महत्वाच्या बातम्या

 निवेदनाची दखल : शहरातील स्वच्छता व पथदिवा दुरुस्तीच्या कामांना वेग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीचे नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार यांनी मुख्याधिकारी राजू सिडाम यांना सादर केलेल्या निवेदनाची नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम आणि पथदिव्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि वसाहतींमध्ये स्वच्छता मोहिमेला गती देण्यात आली आहे. नाल्यांमधील साचलेला गाळ व कचरा काढणे, रस्त्यांच्या कडेला वाढलेली झुडपे व पालापाचोळा हटविणे तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेले पथदिवे दुरुस्त करून सुरू करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा धोका टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत असून शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. नाल्यांची साफसफाई आणि पथदिवे कार्यान्वित झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार यांनी नगरपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त करत उर्वरित फॉगिंग आणि ब्लीचिंग पावडर फवारणीची कामेही तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरातील मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय कायम राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos