आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश : सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी पुन्हा सुरू


- मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर NSAP पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर; हजारो वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी नोंदणी करताना एनएसएपी (National Social Assistance Programme – NSAP) पोर्टलवर निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी रखडली होती. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिल्यानंतर पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एनएसएपी पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या केंद्र पुरस्कृत महत्त्वाच्या योजनांमध्ये नवीन नोंदणी होत नव्हती. परिणामी, अनेक पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. नोंदणी प्रक्रिया बंद असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वृद्ध, विधवा आणि दिव्यांग नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर करून एनएसएपी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करून पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी दूर केल्या आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.
नोंदणी प्रक्रिया पूर्ववत झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना आता कोणत्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय अर्ज सादर करून विविध निवृत्तीवेतन योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत समाधान व्यक्त करत आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हेच आमचे ध्येय आहे. केवळ तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी हा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन आवश्यक निर्देश दिल्यामुळे हजारो गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रश्नावर त्वरित निर्णय घेतल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही व्यक्त केले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी पुन्हा सुरू झाल्याने राज्यातील वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ, गतिमान आणि प्रभावी होण्यास मदत होणार असल्याची भावना लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




