वाघाच्या हल्ल्यानंतर वन विभाग अलर्ट : जंगल परिसरात गस्त वाढवली

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत लाखनी तालुक्यातील किटाडी जंगल परिसरातील पिलांद्री गावाच्या शिवारात दोन दिवसांपूर्वी पट्टेदार वाघाने हल्ला करून एका दुभत्या म्हशीचा जागीच फडशा पाडल्याची घटना घडली.
या घटनेनंतर वन विभागाने तातडीने सतर्कता बाळगत जंगल परिसरात गस्त वाढवली असून वन कर्मचारी आणि जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. वन्यप्राण्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे.
परिसरात पट्टेदार वाघाचा नियमित वावर असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच ग्रामस्थांचे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी भंडारा वन विभाग आणि अड्याळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी व कर्मचारी जंगल परिसरात नियमित गस्त घालत असून संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करत आहेत. जंगलात रानभाज्या, सरपण किंवा इतर कारणांसाठी जाणाऱ्या नागरिकांना आवश्यक खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत.
तसेच वन्यप्राण्यांचा अधिवास, त्यांचा वावर आणि सुरक्षिततेचे नियम याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. वन विभागाच्या या मोहिमेमुळे जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी प्रत्येकाने सतर्कता बाळगूनच जंगल परिसरात वावरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी शक्यतो जंगलालगत जाणे टाळावे. जंगल परिसरात संशयास्पद हालचाल, आवाज किंवा पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल अथवा इतर वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्यास कोणताही धोका पत्करू नये आणि तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.
News - Bhandara




Petrol Price




