मर्यादित कुटुंब हेच सुखी कुटुंबाचे मूळ : जागतिक लोकसंख्या दिन


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : आजच्या आधुनिक युगात वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणे आणि कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कुटुंब नियोजन ही काळाची गरज बनली आहे. कुटुंब नियोजनाच्या पद्धतींचा अवलंब करून आपण आपल्या मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी अधिक वेळ आणि आर्थिक साधने देऊ शकतो. त्यामुळे मर्यादित कुटुंब हेच सुखी कुटुंबाचे मूळ आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी सांगितले.
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय, वर्धा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावर्षीच्या लोकसंख्या दिनाचा मुख्य उद्देश केवळ लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणे हा नसून, प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, शिक्षण आणि संसाधनांचा योग्य लाभ मिळावा हा आहे. जिल्हा रुग्णालय आणि जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंब नियोजनासाठी विविध आधुनिक सुविधा आणि सल्ला मोफत उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही संकोचाशिवाय याचा लाभ घ्यावा, असे अवाहन त्यांनी यावेळी केले.
लोकसंख्येची स्थिरता राखणे आवश्यक आहे. ही जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून ती प्रत्येक नागरिकाची आहे. सुखी आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी कुटुंब नियोजनाचा अवलंब करावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
News - Wardha




Petrol Price




