महत्वाच्या बातम्या

 राममंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ काँग्रेसचा सत्याग्रह


- ट्रस्ट पदाधिकाऱ्यांविरोधात चंद्रपूर पोलिसांत तक्रार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी. १३ जुलै अंचलेश्वर मंदिर शिव देवस्थान अंचलेश्वर गेट येथे रघुपती राघव राजा राम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित कथित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, संविधान आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देणारे हे आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. सत्याग्रहात खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सत्याग्रहादरम्यान प्रभू श्रीरामाचे पूजन, अर्चन व प्रार्थना करण्यात आली. तसेच रघुपती राघव राजा राम, खरा तो एकची धर्म यांसारख्या भजनांचे गायन करण्यात आले. प्रभू श्रीरामांच्या नावाने भक्तांकडून अर्पण झालेल्या देणगीबाबत पूर्ण पारदर्शकता राखली जावी, श्रद्धेचा सन्मान अबाधित राहावा आणि कथित गैरव्यवहारातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

यावेळी काँग्रेसच्या वतीने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या देणगीचा कथित गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या विषयावर केंद्र आणि राज्य सरकारने मौन बाळगल्याचा आरोप करत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. सत्याग्रहाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

सत्याग्रहानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनातून प्रभू श्रीराम हे देशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने त्यांच्या नावाने जमा होणाऱ्या देणगीच्या व्यवस्थापनात पूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेचा विश्वास कायम राहणे आवश्यक असल्याची भूमिका काँग्रेसने मांडली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत हा सत्याग्रह शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

दरम्यान, दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोपींविरुद्ध यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का आणि या प्रकरणात इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याची चौकशी करून आवश्यक असल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गतही तपास करण्याच्या सूचना नमूद करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos