महत्वाच्या बातम्या

 बोरीचे झाड तोडण्याच्या वादातून हाणामारी : तरुणासह मध्यस्थीलाही मारहाण, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तिरोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेडेपार गावात बोरीचे झाड तोडण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत एका तरुणाला काठीने मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा आरोप असून, त्याच्या बचावासाठी पुढे आलेल्या आईला धक्का देऊन खाली पाडण्यात आले. तसेच वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी ५ घडली. या प्रकरणी शुक्रवारी १० बाप-लेकाविरुद्ध तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश गोविंद मानकर ३७ वर्षे, रा. खेडेपार हा रविवारी सकाळी सुमारे ११ ते ११.१५ वाजण्याच्या दरम्यान घरी असताना मोतीराम रामलाल पटले ७० वर्षे व त्यांचा मुलगा सुनील मोतीराम पटले ४०वर्षे, दोघेही रा. खेडेपार हे सतीशच्या हिस्स्यातील बोरीचे झाड तोडत होते. याबाबत सतीशच्या आईने जाब विचारला असता आरोपी मोतीराम यांनी शिवीगाळ करत हातातील कुऱ्हाड घेऊन तिच्या दिशेने धाव घेतल्याचा आरोप आहे.

प्रसंगावधान राखत सतीशने आरोपीच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली. त्यानंतर काही वेळाने मोतीराम आणि सुनील हे दोघे काठ्या घेऊन पुन्हा सतीशच्या घराच्या अंगणात आले. यावेळी सुनील यांनी माझ्या वडिलांना का मारले? असे म्हणत शिवीगाळ केली, तर मोतीराम यांनी हातातील काठीने सतीशच्या डाव्या हातावर वार करून त्याला जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यावेळी सुनील यांनी अंगणात पडलेले फावडे उचलून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र, सतीशच्या बचावासाठी त्याची आई पुढे आल्याने आरोपींनी तिला धक्का दिला. त्यामुळे ती खाली पडून जखमी झाली. यानंतर दोघेही आरोपी घरात घुसल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेले दिवाण सुकराम कटरे यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी मोतीराम रामलाल पटले व सुनील मोतीराम पटले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३३३, ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos