महत्वाच्या बातम्या

 कोट्यवधींच्या धान्य व्यवहारात कथित फसवणूक : दलाल, राईस मिल संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील धान्य व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अधिक दर मिळवून देण्याचे आमिष दाखवत धान्य खरेदी करूनही त्याची रक्कम न देता वारंवार टाळाटाळ केल्याचा आरोप करत तीन व्यापाऱ्यांनी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे दलाल व राईस मिलच्या संचालकाविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार नंदकिशोर नामदेव वैद्य रा. अ-हेरनवरगाव, ता. ब्रह्मपुरी हे धान्य व्यापाराचा व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, देसाईगंज येथील धान्य दलाल सुनील टोलाराम रामनानी याने भंडारा जिल्ह्यातील शिंगोरी येथील KMC ग्रेन मिलिंग अँड प्रोसेसिंग युनिट LLP मध्ये ब्रह्मपुरीपेक्षा अधिक दराने धान्य विक्री करून देण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वी व्यवहार यशस्वी झाल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणात धान्य पाठविले.

त्यानुसार १० जून २०२५ ते ५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नंदकिशोर वैद्य यांनी २२ ट्रक धान्य, एकूण ६००१.०५ क्विंटल, अंदाजे १ कोटी २९ लाख ९० हजार ३२ रुपये किमतीचा माल संबंधित कंपनीकडे पाठविला. ठरलेल्या मुदतीनंतरही रक्कम न मिळाल्याने त्यांनी वारंवार संपर्क साधला असता सुरुवातीला बँक कर्जाचे कारण सांगून वेळ मागण्यात आला. नंतर पैसे मागण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिल्यावर उडवाउडवीची उत्तरे देत धमकी दिली.

यानंतर तक्रारदार व इतर व्यापाऱ्यांनी कंपनीचे संचालक मतीन अहमद गनी अहमद कुरेशी यांची भेट घेतली असता त्यांनीही आणखी काही काळ थांबण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही कोणताही भरणा झाला नाही. पुन्हा पैसे मागण्यासाठी गेल्यावर अजून धान्य द्या, त्यानंतरच जुने पैसे मिळतील, अन्यथा जे करायचे ते करा, अशा शब्दांत अपमानास्पद वागणूक दिली.

नंतर व्हॉट्सस्पॉट समूहावर काही जमिनींच्या कागदपत्रांची माहिती समोर आल्यानंतर दलाल व संबंधित कंपनीच्या संचालकांमध्ये संगनमत असल्याचा संशय अधिक बळावला. याबाबत विचारणा केल्यावरही समाधानकारक उत्तर न देता शिवीगाळ व धमकी दिली.

या प्रकरणात नंदकिशोर वैद्य यांच्याशिवाय व्यापारी विनोद वामनराव कावळे यांची ७५ लाख ७० हजार ८१६ रुपये, तर रामदास हरिभाऊ जिभकाटे यांची १० लाख ४४ हजार ५२९ रुपये इतकी रक्कमही थकीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तिघा व्यापाऱ्यांची एकूण थकीत रक्कम सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी सुनील टोलाराम रामनानी रा. देसाईगंज, जि. गडचिरोली व मतीन अहमद गनी अहमद कुरेशी संचालक, KMC ग्रेन मिलिंग अँड प्रोसेसिंग युनिट LLP, शिंगोरी, जि. भंडारा यांच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, धमकी व अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos