अड्याळ टेकडीमध्ये वाद पेटला : भू-वैकुंठ समितीचा मोझरी संस्थेविरोधात आंदोलनाचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अड्याळ टेकडी येथील भू-वैकुंठ समितीने अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज मोझरी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कथित आदिवासी प्रबोधन मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शविला असून, ११ जुलै २०२६ रोजी हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत अहिंसक सत्याग्रह व निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
भू-वैकुंठ समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांनी १९६७ मध्ये अड्याळ टेकडी येथे दीर्घ तपश्चर्या करून ग्रामगीतेच्या विचारांवर आधारित भू-वैकुंठाचा उपक्रम सुरू केला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व गुरुदेव भक्तांच्या सहकार्याने येथे आध्यात्मिक, सामाजिक व ग्रामविकासाचे कार्य सातत्याने सुरू असून, समितीचा या ठिकाणी अखंड ताबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, गुरुकुंज मोझरी संस्थेचा या कार्यात कोणताही सहभाग नसताना त्यांनी अड्याळ टेकडीवरील मालकी हक्कासाठी विविध न्यायालयांत दावे दाखल केले. मात्र, त्यांना यश मिळाले नसून, २ मे २०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित प्रकरण पुन्हा ब्रह्मपुरी न्यायालयाकडे पाठविले असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
भू-वैकुंठ समितीने आरोप केला आहे की, अड्याळ टेकडी ही आत्मचिंतन, मौन साधना, सत्संग आणि ग्रामविकासाचे आध्यात्मिक केंद्र असून, तेथे जातीय किंवा राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम कधीच आयोजित करण्यात आले नाहीत. अशा ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि टेकडीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही समितीने केला आहे.
समितीने स्पष्ट केले की, अड्याळ टेकडीवरील धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाला बाधा पोहोचविणारे कोणतेही कार्यक्रम सहन केले जाणार नाहीत. या पार्श्वभूमीवर ११ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमाला अहिंसक मार्गाने विरोध, निषेध आणि सत्याग्रह करण्यात येणार असून, सर्व गुरुदेव भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या अध्यक्षांनी केले आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज मोझरी यांची अधिकृत भूमिका प्राप्त होऊ शकली नाही.
News - Chandrapur




Petrol Price




