महत्वाच्या बातम्या

 खरीप हंगामासाठी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न


- बीबीएफ पद्धतीचा अवलंब करा : डॉ. विजय सिडाम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चिमूर तालुक्यातील काग येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (अटारी, पुणे) अंतर्गत एकदिवसीय सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया आणि उत्पादन वाढीच्या उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र (सिंदेवाही) येथील कृषी विस्तार विषय तज्ज्ञ डॉ. विजय एन. सिडाम यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीतील आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतींची माहिती दिली. त्यांनी विशेषतः रुंद वरंबा सरी (BBF – Broad Bed Furrow) पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन केले. या पद्धतीमुळे सुमारे २० टक्के बियाणे व खतांची बचत होते तसेच पावसातील खंडकाळात पिकाचे संरक्षण होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

डॉ. सिडाम यांनी पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रति किलो बियाण्यास थायरम व कार्बेन्डाझिम (३ ग्रॅम) या मिश्र घटकांची बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. तसेच खोडमाशीच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्साम ३० एफएस (१० मिली प्रति किलो बियाणे) वापरण्याचे आणि नत्र स्थिरीकरणासाठी रायझोबियम जॅपोनिकम व पीएसबी (२०–२५ ग्रॅम) या जैविक संवर्धकांचा वापर करण्याचे त्यांनी सांगितले.

मान्सूनमध्ये ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर १५ जुलैपूर्वी पेरणी पूर्ण करावी, असेही त्यांनी नमूद केले. पेरणी करताना खोली ४ सेंमीपेक्षा जास्त ठेवू नये, असे मार्गदर्शन करण्यात आले. अधिक उत्पादनासाठी सोयाबीनसोबत तूर, ज्वारी किंवा कपाशी यांसारख्या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करताना प्रति एकर २६ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि २० किलो म्युरेट ऑफ पोटॅश वापरण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच पिकाच्या वाढीच्या अवस्थेत नत्राची गरज पूर्ण करण्यासाठी ५० व ७० दिवसांनी २ टक्के युरिया किंवा १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करण्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV), अकोला यांच्या अंबा’ या सुधारित सोयाबीन वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कैलास कामडी यांच्यासह स्थानिक शेतकरी व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.





  Print






News - Chandrapur




Related Photos