महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोडच कायमस्वरूपी उपाय : अधिवेशनात आ. किशोर जोरगेवार यांची जोरदार मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आणि नागरिकांना होत असलेला मनस्ताप लक्षात घेता पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयादरम्यान स्वतंत्र रिंगरोड (बायपास) मार्गाची तातडीने उभारणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली.

सभागृहात बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा हा कोळसा, सिमेंट, वनसंपदा आणि विविध उद्योगांमुळे राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक जिल्हा आहे. मात्र, शहरातून जाणाऱ्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा स्वतंत्र पर्यायी मार्ग नसल्याने जड वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातूनच होत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

त्यांनी सांगितले की, बाबूपेठ, बंगाली कॅम्प, रामनगर, वरोरा नाका आणि पडोली या परिसरांमध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून वाहतूक कोंडी गंभीर स्वरूप धारण करत आहे. या मार्गांवर वारंवार अपघात घडत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तसेच विद्यार्थी, व्यापारी, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य प्रवाशांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

चंद्रपूर शहराला या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयादरम्यान स्वतंत्र रिंगरोड उभारणे हाच प्रभावी पर्याय असल्याचे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचेही त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रस्तावाला शासनाने प्राधान्य देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर रिंगरोडच्या कामास प्रशासकीय मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.





  Print






News - Chandrapur




Related Photos