महत्वाच्या बातम्या

 उपचारासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचा गैरफायदा : बंद घर फोडून दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : उपचारासाठी पत्नीसह बाहेर गावी गेलेल्या फळ विक्रेत्याच्या कुटुंबाचा अज्ञात चोरट्यांनी गैरफायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घटनेत सुमारे ७१ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

राजेंद्र प्रसाद वार्ड येथे राहणारे मोहम्मद अस्लम शेर मोहम्मद (वय ४०) हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नीची प्रकृती अस्वस्थ असल्याने २२ जून रोजी ते तिला सोनोग्राफीसाठी गडचांदूर येथील रुग्णालयात घेऊन गेले होते. घराला कुलूप लावून गेलेल्या कुटुंबाने त्यानंतर नातेवाईकांकडे मुक्काम केला.

दरम्यान, २३ जून रोजी रात्री अस्लम मोहम्मद घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून त्यातील दागिने ठेवलेला डबा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे मंगळसूत्र, कानातील दागिने, काळी पोत, अंगठी तसेच १०७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ७१ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

घर बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही घरफोडी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos