महत्वाच्या बातम्या

 बंगाली कॅम्प मच्छी मार्केटवर पोलिसांचा छापा : ६०० किलो प्रतिबंधित थाई मांगुर मासे जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
रामनगर पोलिसांनी बंगाली कॅम्प मच्छी मार्केट परिसरात धाड टाकून केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या थाई मांगुर जातीच्या माशांची मोठी खेप जप्त केली. या कारवाईत सुमारे ६०० किलो मासे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यंकटेशराव थिरपतीराव घंटासाला रा. प्रथिकोल्लांका, जिल्हा ईलूरु, आंध्र प्रदेश असे  आरोपींचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, २२ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे व पोलीस हवालदार शरद कुडे हे हद्दीत गस्त घालत असताना खात्रीशीर माहिती मिळाली. बंगाली कॅम्प मच्छी मार्केट येथे एका महिंद्रा बोलेरो पिकअप मधून प्रतिबंधित थाई मांगुर मासे विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती मिळताच याबाबत पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना कळविण्यात आले.

त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकून वाहनाची तपासणी केली. वाहनातील मासे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून सदर मासे थाई मांगुर जातीचे असल्याची पुष्टी केली.

थाई मांगुर हा मासा पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने घातक मानला जात असल्याने त्याच्या पैदास, वाहतूक व विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपी व्यंकटेशराव थिरपतीराव घंटासाला रा. प्रथिकोल्लांका, जिल्हा ईलूरु, आंध्र प्रदेश याला ताब्यात घेतले.

आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८५४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २२३, २७२, २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ (आय) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे ६०० किलो थाई मांगुर मासे आणि सुमारे ७ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो क्रं. टीएस ०६ यूबी ६५३८ वाहन जप्त करण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोहवा शरद कुडे, आनंद खरात, जितेंद्र आकरे, बाबा नैताम, पोअं प्रकाश मडावी तसेच रामनगर डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos