महत्वाच्या बातम्या

 स्मार्ट मीटर हटवा, जुने मीटर बसवा; अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा : शहर विकास आघाडीचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील वीज ग्राहकांच्या घरांमध्ये बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिले येत असल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला (महावितरण) १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावेत तसेच वाढीव वीजदर आणि स्लॅब पद्धतीतील आकारणी कमी करावी, अन्यथा महावितरणच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आघाडीचे अध्यक्ष भारत थुलकर यांनी दिला.

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील वीजदर इतर अनेक राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. चंद्रपूरसारख्या वीज निर्मिती करणाऱ्या जिल्ह्यातील ग्राहकांनाही वाढीव वीजदरांचा आर्थिक फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, अनेक ग्राहकांच्या घरांतील जुने मीटर व्यवस्थित कार्यरत असतानाही ते बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात आले. या स्मार्ट मीटरमुळे वीज वापर कमी असतानाही जास्त रीडिंग दाखविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी काही ग्राहकांना दरमहा पाच हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंत वीजबिले येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

याशिवाय वीजबिलामध्ये मीटर भाडे, सुरक्षा ठेव, वीज विक्री कर, इंधन समायोजन आकार, स्थिर आकार आणि वहन आकार यांसारख्या विविध शुल्कांचा समावेश करून ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांचे आर्थिक शोषण होत असल्याचे शहर विकास आघाडीचे म्हणणे आहे.

महावितरणने १५ दिवसांच्या आत स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसवावेत, वाढीव वीजदर कमी करावेत आणि ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा बल्लारपूर येथील महावितरण कार्यालयावर जंगी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी आघाडीचे अध्यक्ष भारत थुलकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात शरद वानखेडे, प्रभु तांड्रा, नरेंद्र हीरे, धर्मेंद्र गायकवाड, रवि वनकर, नगर सेविका प्रियंका थूलकर,  सुमीत ताकसांडे, सुनीताताई राठोड, रामदास तडस, राजू रणदिवे, राजन जयस्वाल, शाहबिरखा पठाण, मनोहर मानुसमारे, राजेश बोंकुर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.





  Print






News - Chandrapur




Related Photos