घरासमोर जादूटोण्याचे साहित्य टाकून दहशत निर्माण : शेजाऱ्यासह आईविरुद्ध गुन्हा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील मठ वार्ड परिसरात एका कुटुंबाच्या घरासमोर वारंवार जादूटोण्याचे साहित्य टाकून मानसिक त्रास, भीती व दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सागर नंदकिशोर निखाते (वय २७), रा. मठ वार्ड, शेगाव (बु.), हे पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराशेजारी राहणारे स्वप्नील विलास निखाते यांच्याशी पूर्वीपासून वाद असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये बोलचाल बंद आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी फिर्यादीच्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर व कंपाऊंडमध्ये काळी बाहुली, कापलेले लिंबू, बाहुलीवर लावलेला फोटो, त्यावर ठोकलेले खिळे, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, दगड तसेच पळसाच्या पानात ठेवलेले विविध साहित्य अशा स्वरूपाचे जादूटोण्याशी संबंधित साहित्य टाकण्यात येत होते. त्यामुळे कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकाराबाबत खात्री करण्यासाठी फिर्यादीने घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, २० जून २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजताच्या सुमारास शेजारी राहणारे स्वप्नील निखाते हे संबंधित साहित्य घरासमोर टाकताना दिसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान फिर्यादी सागर निखाते, त्यांची आई, पत्नी व बहीण यांनी स्वप्नील निखाते यांच्या घरासमोर जाऊन या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यावेळी स्वप्नील निखाते यांची आई रेणुका विलास निखाते यांनी चप्पल घेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच स्वप्नील निखाते यांनी फिर्यादीच्या आईला ढकलून मारहाण केली. यावेळी दोघांनीही अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
आरोपींकडून केवळ फिर्यादीच्या घरासमोरच नव्हे तर परिसरातील अन्य एका महिलेच्या घरासमोरही अशाच प्रकारचे साहित्य टाकून भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत होते. या कृत्यामुळे स्वतःच्या व कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भावना फिर्यादीने व्यक्त केली आहे.
या तक्रारीच्या आधारे शेगाव पोलिसांनी आरोपी स्वप्नील विलास निखाते व रेणुका विलास निखाते यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३(५), ३५२, ११५(२) व २९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या नावाखाली घडणाऱ्या घटनांविरोधात राज्य शासनाने कठोर कायदा लागू केलेला असताना शेगाव (बु.) येथील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे सखोल तपास सुरू असून प्रकरणातील सत्य परिस्थिती तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
News - Chandrapur




Petrol Price




