आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या मत्स्यव्यवसायाला चालना : मुंबईत २५ जून रोजी निर्णायक बैठक

- ३ कोटी झिंगा बीज प्रकल्पावर उच्चस्तरीय चर्चा; जिल्ह्यातील झिंगा पालनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील झिंगा पालन व्यवसायाला गती देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील मत्स्यपालकांना टायगर प्रॉन्स (झिंगा) जातीचे उच्च दर्जाचे बियाणे शासनामार्फत उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली २५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मंत्रालयात ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुमारे ३ कोटी झिंगा बीज उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जलस्रोतांचा प्रभावी वापर करून मत्स्य उत्पादन वाढविणे, मत्स्यपालकांचे उत्पन्न उंचावणे तसेच ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देणे या उद्देशाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत मत्स्यव्यवसाय विभागाने मंत्रालय स्तरावर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असून, झिंगा पालन व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक उपाययोजना, बियाणे पुरवठा आणि अंमलबजावणीच्या आराखड्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव, आयुक्त, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक चंद्रपूर जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विकासाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून कार्यरत असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील मच्छीमार बांधवांच्या कल्याणासाठी आणि मत्स्यव्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक दूरगामी व ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याचा देशातील पहिला निर्णय, किसान क्रेडिट कार्ड व डिझेल परतावा योजना, तलाव खोलीकरणाला प्रोत्साहन, मत्स्य सहकारी संस्थांवरील उत्पादन मर्यादेतील सवलत तसेच स्वतंत्र आर्थिक कल्याणकारी मंडळाची स्थापना यांसारख्या निर्णयांचा त्यात समावेश आहे.
याशिवाय मत्स्य संवर्धन, मत्स्यबीज उत्पादन, प्रशिक्षण, विपणन, मूल्यवर्धन आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रात प्रभावी योजना राबवून राज्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यात आली आहे. आता प्रस्तावित ३ कोटी झिंगा बीज प्रकल्प मंजूर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यपालकांसाठी उत्पन्नवाढीच्या नव्या संधी निर्माण होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे.
News - Rajy




Petrol Price




