महत्वाच्या बातम्या

 सायबर ठगाचा पर्दाफाश : बनावट कर्ज मंजुरीच्या आमिषाने लाखो रुपये लाटणारा आरोपी गजाआड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून बनावट कर्ज मंजुरी पत्रे तयार करून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा चंद्रपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पुणे येथून एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नागरिकांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बाबुपेठ येथील हार्वेस्टर मशीन विक्रेत्याला त्याच्या ग्राहकामार्फत हेमंत जोशी नावाच्या व्यक्तीचा संपर्क मिळाला. संबंधित व्यक्तीने स्वतःला पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड, नागपूरचा कर्मचारी असल्याचे सांगत हार्वेस्टर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने दोन ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत बनावट कर्ज करारपत्रे तयार केली.

यानंतर तक्रारदाराच्या व्हॉट्सअ‍ॅपवर १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दर्शविणारे बनावट लोन सॅंक्शन लेटर पाठविण्यात आले. कर्जाची रक्कम खात्यात जमा करण्यापूर्वी डाऊन पेमेंट म्हणून ४ लाख ४६ हजार २५० रुपये वृषभ ईखार, जनरल मॅनेजर, पुनावाला फिनकॉर्प या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने १६ मे २०२६ रोजी आयएमपीएसद्वारे ही रक्कम संबंधित खात्यात वर्ग केली.

रक्कम जमा झाल्यानंतर आरोपीने कर्ज वितरण व मशीन डिलिव्हरीबाबतची बनावट मंजुरीपत्रे आणि वाहन वितरणाशी संबंधित ई-मेल पाठविले. मात्र १९ मेपासून आरोपीचा मोबाईल क्रमांक बंद येऊ लागल्याने तक्रारदाराला संशय आला. त्यांनी नागपूर येथील कंपनीच्या कार्यालयात चौकशी केली असता हेमंत जोशी नावाचा कोणताही कर्मचारी नसल्याचे तसेच सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले.

यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून चंद्रपूर शहर पोलिसांनी ३ जून २०२६ रोजी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी तपास सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपी विनोद शांताराम गडाख पाटील (वय ४४) याचा शोध घेत पुण्यातील बाणेर परिसरातून त्याला अटक केली.

तपासादरम्यान आरोपीने नाशिक, लखनऊ, इंदूर आणि वडोदरा येथेही विविध बनावट नावांचा वापर करून अशाच प्रकारच्या फसवणुका केल्याचे निष्पन्न झाले आहे. हेमंत जोशी, हेमंत पवार, रणवीर सिंग सिकरवार, राम हरी चंद, मयंक वानखेडे, अभिषेक शर्मा, जितेंद्र श्रीवास्तव, निखिल यादव, विठ्ठल पाटील आणि विनोद पाटील अशा विविध नावांनी तो लोकांची दिशाभूल करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपासात भारतीय न्याय संहितेतील कलम २३८(सी), ३३६(२), ३३८ आणि ३४० यांचीही वाढ करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात सहा. पोलीस निरीक्षक निलेश गिरी, सहा. पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, सहा. पोउपनि मुजावर अली, पोहवा कार्तीक खनके, पोहवा उमेश रोडे, पोअं राहुल पोंदे, पोअं वैभव पत्तीवार, पोअं गुणवंत मुंडके, पोअं पंकज बावणे सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर आणि पोहवा खुशाल चांदेकर, पोहवा मंगेश झाडे पोस्टे चंद्रपूर शहर, चापोअं रुषभ बारसिंगे स्थागुशा चंद्रपूर यांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos