उष्माघाताने ताडोबा बफर क्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) बफर क्षेत्रातील पळसगाव वनपरिक्षेत्रात चार महिन्यांच्या नर वाघ बछड्याचा मृतदेह शनिवारी सायंकाळी आढळून आला. प्राथमिक तपासात उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मृत बछडा हा परिसरात नियमितपणे निरीक्षणाखाली असलेल्या एका वाघिणीच्या तीन पिल्लांपैकी एक होता. बछड्याचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.
वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोबरागडे आणि डॉ. कुंदन पोडचलवार यांनी बछड्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, उष्माघातामुळे झालेल्या तीव्र मज्जासंस्थाविषयक धक्क्यामुळे (न्यूरोलॉजिकल शॉक) बछड्याचा मृत्यू झाला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी या निष्कर्षाला दुजोरा देत सांगितले की, बछड्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा अथवा घातपाताचे चिन्ह आढळून आलेले नाही. त्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, संबंधित वाघिणीची उर्वरित दोन्ही पिल्ले पूर्णपणे निरोगी असून ती सध्या आपल्या आईसोबत जंगलात सुरक्षितपणे वावरत आहेत. बफर क्षेत्रातील वन्यजीवांच्या नियमित निरीक्षणाचा भाग म्हणून वनविभागाकडून वाघिणी व तिच्या उर्वरित पिल्लांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




