विहिरीत पडून वाघाचा मृत्यू : तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीट परिसरात एका शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मृत वाघाचा मृत्यू सुमारे तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
चारगाव बगडे-हजारीचक परिसरातील शेतकरी पांडुरंग गजभिये हे रविवारी सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना विहिरीजवळ तीव्र दुर्गंधी जाणवली. संशय आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यामध्ये एका वाघाचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी तत्काळ वन विभागाला याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच वनरक्षक सचिन चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार, क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, फुलझाले, ममता गायकवाड तसेच वनरक्षक ऋषी जावडे व राहुल धनविजय यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे., राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) प्रतिनिधी बंडू धोतरे तसेच स्वाब संस्थेचे अध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक यश कायरकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
पंचनामा पूर्ण झाल्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरपाम यांनी मृत वाघाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, जंगलालगतच्या परिसरातील उघड्या विहिरी वन्यप्राण्यांसाठी जीवघेणा सापळा ठरत असल्याचे वन्यजीव अभ्यासक यश कायरकर यांनी सांगितले. अशा विहिरींना संरक्षक कठडे उभारण्यासाठी वन विभागाने दोन वर्षांपूर्वीच वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
News - Chandrapur




Petrol Price




