महत्वाच्या बातम्या

 ग्राहकांना मद्यपानाची सुविधा पुरवणाऱ्या दुकानदारावर गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मुख्य मार्गावरील एका डेली निड्स दुकानात अवैधरित्या देशी दारू विक्री करून ग्राहकांना मद्यपानासाठी बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दुकानदाराविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्थानिक पोलीस पथक १८ मे रोजी अवैध दारू व जुगार अड्ड्यांविरोधात विशेष मोहिम राबवत असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, मुख्य मार्गावरील डेली निड्स दुकानात विनापरवाना देशी दारूची विक्री सुरू असून ग्राहकांना तेथेच बसून मद्यपान करण्याची सुविधा दिली जात आहे.

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला. त्यावेळी दुकानाबाहेरील लोखंडी टेबलांवर काही ग्राहक मद्यपान करताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित ग्राहक तेथून पळून गेले. 

पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता काऊंटरखाली विक्रीसाठी ठेवलेले २५ नग रॉकेट संत्रा देशी दारूचे पाउच, तसेच ग्राहकांना मद्यपानासाठी उपलब्ध करून दिलेले दोन लोखंडी टेबल, एक लोखंडी बेंच, दोन प्लास्टिक स्टूल आणि अर्धवट भरलेली विदेशी दारूची बाटली असा एकूण २,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी राजेश्वर बंकावार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) व ६८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos