महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत रानटी हत्तींचा वावर : दिभना ते आमिर्झा वनक्षेत्रात तेंदू पत्ता संकलन करताना काळजी घ्या 


- मानद वन्यजीव रक्षक अजय कुकडकर 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असून, ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी जंगलात जात आहेत. मात्र, दिभना ते आमिर्झा मार्गावरील जंगलात सध्या रानटी हत्तींचा कळप आणि इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे महत्त्वाचे आवाहन मानद वन्यजीव रक्षक अजय कुकडकर यांनी केले आहे.

तेंदूपत्ता तोडणीसाठी मजूर आणि गावकरी अनेकदा पहाटेच्या अंधारातच जंगलाची वाट धरतात. मात्र, पहाटेच्या वेळी वन्यप्राणी अधिक सक्रिय असतात आणि अंधारामुळे ते सहजासहजी नजरेस पडत नाहीत. दिभना ते आमिर्झा या वनपरिक्षेत्रात सध्या हत्तींच्या कळपाने मुक्काम ठोकला असल्याने, अचानक गाठभेट होऊन प्राणहानीचा किंवा गंभीर दुखापतीचा मोठा धोका निर्माण होऊ शकते.

या वन्यप्राण्यांच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर जंगल परिसराला लागून असलेल्या  दिभना, कळमटोला, पीपरटोला, गोगाव, चूरचुरा, देशपूर, कुरंजा, गावातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.  परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मानद वन्यजीव रक्षक अजय कुकडकर यांनी गावकऱ्यांना विनंती केली आहे की, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पहाटेच्या अंधारात जंगलात जाऊ नये. तसेच खोलवर जंगलात जाऊ नये. सूर्योदय झाल्यानंतर, पुरेसा प्रकाश पडल्यावरच आणि एकट्याने न जाता समूहानेच जंगलात जावे. जंगलात वावरताना आजूबाजूच्या परिस्थितीबाबत सतर्क राहावे.

तसेच, वन्यप्राण्यांची चाहूल लागल्यास त्यांच्या जवळ जाण्याचा किंवा त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न न करता, तात्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा आणि वनविभागाला याची माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी वनविभागाच्या आणि वन्यजीव रक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःच्या जिवाचे रक्षण करावे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos