जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर : मातोश्री पांदन रस्त्याच्या कामास भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या मातोश्री पांदन रस्त्याच्या कामांना जिल्हाधिकारी यांनी गतिशीलता आणली आहे. जिल्हाधिकारी यांनी काल, २३ एप्रिल रोजी मातोश्री पांदन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मौजा डव्वा (ता. भंडारा) आणि मौजा पालांदूर (ता. लाखनी) येथे भेट दिली.
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याचे खडीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामांचे निरीक्षण केले. त्यांनी सांगितले की, या कामांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, तसेच पावसाळ्यात चिखल आणि खड्यामुळे शेतकऱ्यांना होणारी अडचण कमी होईल.
जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले की, भंडारा व लाखनी तालुक्यातील तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त कामे पावसाळ्यापूर्वी भौतिकदृष्ट्या पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच कामे टिकाऊ व गुणवत्तापूर्ण असावीत, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी डव्वा व पालंदूर येथील शेतकऱ्यांचे मत ऐकले आणि त्यांच्या समाधानाची माहिती घेतली. पालंदूर येथे उपस्थित मजुरांशी संवाद साधून कामांच्या गुणवत्तेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, पांदन रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि मंजूर वेळेत पूर्ण होईल, याची काळजी प्रशासनाने घ्यावी.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे तहसीलदार आणि यंत्रणेला कामाची स्पष्ट दिशा मिळाली असून शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा उत्साहही वाढला आहे. या भेटीमुळे ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला निश्चितच नवचैतन्य मिळाले आहे.
News - Bhandara




Petrol Price




