महत्वाच्या बातम्या

 भात शेतीत खर्च कमी, उत्पादन वाढीसाठी डिजिटल शेतीशाळा : २२ एप्रिलला विशेष मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : अनियमित पाऊस आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे भात शेतीसमोरील आव्हाने वाढत असताना, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित लागवड तंत्रांचा अवलंब अत्यावश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’अंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल शेतीशाळा मालिकेतील चौथे सत्र २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सत्रात भात लागवडीतील सुधारित व हवामान अनुकूल तंत्रज्ञानांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

यामध्ये भाताची थेट पेरणी (DSR), पद्धत, टोकण पद्धत तसेच भात लागवडीची यांत्रिकी पद्धत या विषयांचा समावेश आहे. या तंत्रज्ञानांच्या माध्यमातून पाण्याची बचत, मजुरी खर्चात कपात आणि उत्पादनात वाढ कशी साधता येईल, यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, या मालिकेतील आधीच्या सत्रांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञानांवर मार्गदर्शन करण्यात आले होते, तर दुसऱ्या सत्रात जैविक व नैसर्गिक निविष्ठा निर्मितीवर भर देण्यात आला. तिसऱ्या सत्रात पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनाविषयी माहिती देण्यात आली. या सर्व सत्रांमध्ये लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

या डिजिटल शेतीशाळेची वैशिष्ट्ये म्हणजे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सहभाग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तत्काळ मिळणारी उत्तरे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव, ज्यामुळे संवादात्मक व परिणामकारक शिकण्याची प्रक्रिया घडत आहे.

सदर सत्राचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग (AgricultureDepartmentGoM), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRAMaharashtra) आणि पानी फाउंडेशनच्या (PaaniFoundation) या यूट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.

भात उत्पादक शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभाग तसेच आत्मा विभाग मार्फत करण्यात आले आहे. 





  Print






News - Bhandara




Related Photos