गडचिरोली-चामोर्शी मार्गावर प्रवाशांचे हाल : प्रवासी निवाऱ्याचा अभाव

- विद्यार्थी अन् नागरिकांना उन्हातच उभे राहून करावी लागतेय बसची प्रतीक्षा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा मुख्यालयाचे शहर असलेल्या गडचिरोलीमध्ये विविध शासकीय कामांसाठी आणि शिक्षणासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक व विद्यार्थी येत असतात. मात्र, शहरातील महत्त्वाच्या असलेल्या चामोर्शी मार्गावर अद्यापही प्रवासी निवाऱ्याची सोय करण्यात आलेली नाही. परिणामी, रणरणत्या उन्हात प्रवाशांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेला उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चामोर्शी मार्ग हा शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांत ये-जा करतात. परंतु, या मार्गावर बस थांबण्यासाठी निवारा नसल्याने प्रवाशांना भररस्त्यात उभे राहावे लागते. सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, तडकत्या उन्हात तासनतास उभे राहिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर पावसाळ्यातही या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होते. डोक्यावर छप्पर नसल्याने पावसात भिजावे लागते, तर उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका निर्माण होतो. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी चामोर्शी मार्गावर तातडीने प्रवासी निवारा उभारण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, संबंधित विभागाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही.
प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून चामोर्शी मार्गावर प्रवासी निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जर लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध झाली, तर विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




