महत्वाच्या बातम्या

 बनावट शालार्थ प्रकरण : राज्यस्तरीय एसआयटीला तीन महिन्यांची मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : बनावट शालार्थ आयडी तयार करून शिक्षक पद मिळवून सरकारचा कोट्यवधींचा वेतन अपहार केल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राज्यस्तरीय विशेष तपास पथकाला (एसआयटी) तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पथकाला ७ जून २०२६ पर्यंत तपास पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे. ही मुदतवाढ ८ मार्चपासून लागू होईल, असे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. पात्रता नसतानाही बनावट शालार्थ आयडी तयार करून शेकडो शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. या शिक्षकांनी अनेक वर्षे वेतन घेतले असून सरकारला कोट्यवधींचा गंडा बसला.

तपासात शिक्षण उपसंचालक, बोर्ड अध्यक्ष, वेतन पथक अधीक्षकांसह वरिष्ठ स्तरावरील २७ अधिकारी व कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस ठाणे व सायबर शाखेकडून सुरू झाला, नंतर शिक्षण विभागाने स्वतःची एसआयटी स्थापन केली. त्यानंतर शहर पोलिसांनी देखील एसआयटी स्थापन केली.

प्रकरणाची व्याप्ती नागपूर शहर किंवा विभागापुरती मर्यादित न राहता राज्यभरात अशी प्रकरणे समोर येऊ शकतात, म्हणून राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या पथकात शिक्षण विभाग, पोलिस खाते आणि इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी आहेत.

एसआयटीने मागील तीन महिन्यांपासून तपास सुरू केला आहे, मात्र प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेता पथकाने चौकशीसाठी मुदतवाढ मागितली होती. शासनाने यास मान्यता देत ७ जून २०२६ पर्यंत मुदत वाढवली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos