महत्वाच्या बातम्या

 आर्थिक वर्षअखेर जिल्हा कोषागार कार्यालयात मध्यरात्रीपर्यंत कामकाज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : आर्थिक वर्ष २०२५-२०२६ चा शेवटचा दिवस असल्याने ३१ मार्च रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात मध्यरात्रीपर्यंत कामकाज सुरू ठेवण्यात आले. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांची प्रलंबित देयके वेळेत अदा करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत सर्व देयकांचा निपटारा यशस्वीपणे पूर्ण केला.

जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत ई-कुबेर प्रणाली तसेच सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे विविध विभागांची देयके अदा करण्यात आली. आर्थिक वर्षअखेरच्या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेल्या मोठ्या प्रमाणातील बिलांचे परीक्षण, पडताळणी व मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली.

साधारणतः रात्री १ वाजेपर्यंत कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले, अतिरिक्त जिल्हा कोषागार अधिकारी  मिल मिले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्गाने अत्यंत जबाबदारीने काम पार पाडले. सर्व देयके नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने निकाली काढण्यात आली.

गेल्या आर्थिक वर्षभरात जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत एकूण २४,९९७ देयकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये विविध विकासकामे, वेतन, निवृत्तीवेतन, अनुदाने व इतर शासकीय खर्चाचा समावेश आहे. तसेच, कोषागार कार्यालयाने डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर करून कामकाजात गती व पारदर्शकता आणली असून, वर्षअखेरच्या ताणतणावपूर्ण कालावधीतही कोणताही तांत्रिक अडथळा येऊ न देता कामकाज सुरळीत ठेवण्यात आले.





  Print






News - Bhandara




Related Photos