वय वंदना कार्ड काढले का? ज्येष्ठांना १० लाखांचे कवच


- ज्येष्ठाला हक्काचे आरोग्य संरक्षण मिळणार : आता उत्पन्नाची कोणतीही अट नाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : आरोग्यविषयक आणि उपचारांचा खर्च ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी चिंता असते. वाढत्या वयोमानाची हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयुष्मान भारत अंतर्गत ७० वर्षावरील सर्व ज्येष्ठांसाठी वय वंदना ही विशेष योजना सुरू केली आहे. योजनेसाठी आता उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता सत्तरी पार केलेल्या प्रत्येक ज्येष्ठाला हक्काचे आरोग्य संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे तय वंदना कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
असे बनवा वय वंदना कार्ड मोबाइलमध्ये Ayushman App डाऊनलोड करा, Beneficiary पर्याय निवडून मोबाइल नंबर टाका आणि ओटीपीने लॉगिन करा. ७० वर्षे वयाचा पर्याय निवडून आधार नंबर टाका, आधारशी लिंक असलेल्या मोबाइलवर ओटीपी येईल, तो सबमिट करा, स्वतःचा लाइव्ह फोटो काढून ई-केवायसी पूर्ण करा. काही वेळातच कार्ड उपलब्ध होईल.
आयुष्मान आणि वय वंदना कार्डमध्ये काय फरक ?
सामान्य आयुष्मान कार्ड : हे सामाजिक - आर्थिक जात जनगणनेच्या पात्रतेनुसार मिळते, ज्यात कुटुंबाला वार्षिक ५ लाखांपर्यंत उपचार मिळतात.
वय वंदना कार्ड : हे केवळ ७० वर्षावरील व्यक्तींसाठी आहे. जर कुटुंबात दोन ज्येष्ठ असतील, तर दोघांनाही स्वतंत्र किंवा संयुक्त कार्ड मिळते. महत्त्वाचे म्हणजे, हे कार्ड कुटुंबाच्या ५ लाखांच्या मर्यादेव्यतिरिक्त अतिरिक्त संरक्षण देते.
ज्येष्ठांना १० लाखांपर्यंत उपचारांची तरतूद सामान्य आयुष्मान कार्डवर ५ लाखांची मर्यादा आहे. मात्र, ७० वर्षावरील ज्येष्ठांना गंभीर आजारांसाठी जास्त खर्च लागतो. त्यामुळे वय वंदनाअंतर्गत ही मर्यादा वाढवून १० लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. महागड्या शस्त्रक्रिया, गंभीर आजारांचा समावेश या कार्डाद्वारे हृदयाच्या शस्त्रक्रिया (बायपास, अँजिओप्लास्टी), गुडघे व सांधे प्रत्यारोपण, कर्करोग (कॅन्सर), किडनीचे आजार, मोतीबिंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात. औषधे, तपासणी आणि भरती होण्यापूर्वीचा खर्चही यात समाविष्ट आहे.
कॅशलेस व पेपरलेस प्रक्रिया रुग्णालयात भरती होताना रुग्णाला खिशातून एकही रुपया द्यावा लागत नाही. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे पार पडते. केवळ वय वंदना कार्ड आणि आधारकार्ड दाखविल्यानंतर उपचाराची प्रक्रिया सुरू केली जाते. खासगी रुग्णालयातही लागू या योजनेचा लाभ केवळ सरकारी रुग्णालयातच नाही, तर योजनेत समाविष्ट असलेल्या मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही लाभ घेता येतो. भंडारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक नामांकित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
७० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे. ज्यांना मोबाइलवर प्रक्रिया करणे जमत नाही, अशा ज्येष्ठांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) किंवा सेतू केंद्रात जाऊन आधार कार्डाच्या मदतीने हे कार्ड काढून घ्यावे. तसेच सर्व ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात असलेल्या आयुष्मान कक्षातही ही सुविधा मोफत उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील सर्व ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहे, मग त्यांचे उत्पन्न कितीही असो किंवा ते पेन्शनर असोत. ज्येष्ठ नागरिकांनी तातडीने वय वंदना कार्ड काढून घ्यावे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत १० लाखांपर्यंतच्या मोफत उपचारांचा लाभ घेता येईल. नोंदणीसाठी केवळ आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
News - Bhandara




Petrol Price




