नागपुरात ड्रग्ज तस्करांविरुद्ध कारवाईला गती : बाल गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी केंद्राला विनंती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपुरात ड्रग्ज तस्करांविरुद्ध पोलिस कारवाईत वेग आला आहे. डिसेंबर महिन्यात पोलिसांनी घातलेल्या धाडीत लाखोंच्या ड्रग्ज जप्त करण्यात आल्या. या तस्करांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, यापुढे ड्रग्ज तस्करांना मोक्का लावला जाईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यात झीरो टॉलरन्स अभियान राबवून ड्रग्ज तस्करी पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. यावर आमदार प्रवीण दटके यांनी ऑपरेशन थंडर मोहिमेला अधिक व्यापक करण्याची मागणी केली. त्यांनी नागपुरातील ड्रग्ज पेडलर्सचे जाळे शोधण्यासाठी, त्यांचे इतर राज्यांमधील कनेक्शन शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तस्करांची मालमत्ता जप्त करावी आणि बँक खाती गोठवावी, असे सुचवले.
दुसरीकडे, आमदार डॉ. नितीन राऊत यांनी शहरात ड्रग्ज जाळे फोफावले असून, नागपूर पोलिस मुख्य तस्करांविरुद्ध ढिला हात का घेत आहेत, असा सवाल उपस्थित केला.
विशेषतः उत्तर नागपूरच्या झोपडपट्टी भागात १४–१५ वर्षांचे मुलं ड्रग्ज तस्करीसाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे. वयाने लहान असल्यामुळे पोलिस या मुलांना सोडतात, ज्याचा फायदा मुख्य सूत्रधार घेत आहेत. यामुळे परिसरात तलवारी निघणे आणि खुनासारख्या घटना होणे अशक्य नाही.
या गंभीर परिस्थितीवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुन्हेगार लहान मुलांचा बचावासाठी वापर करत आहेत. त्यामुळे बाल गुन्हेगारांचे १८ वरून १६ करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल. तसेच, डॉ. राऊत यांनी दिलेल्या गोपनीय नावांच्या यादीवर त्वरित कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नागपूर पोलिस आता ऑपरेशन थंडर मोहिमेचे कार्यक्षेत्र वाढवून शहरातील ड्रग्ज तस्करांचा संपूर्ण जाळा उध्वस्त करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.
News - Nagpur




Petrol Price




