चंद्रपूरमध्ये स्त्री-शक्तीचा जागर : न्यू होम मिनिस्टर सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर शहरात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला. प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा शनिवारी गांधी चौक येथील महानगरपालिका पटांगणात पार पडला.
मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांना आपल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांसह महिलांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना संध्या सव्वालाखे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
त्यांनी सांगितले की, धानोरकर यांनी संसदेत जिल्ह्याच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडत स्थानिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्याची ओळख देशपातळीवर अधिक ठळकपणे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महिलांनी आव्हानांना धैर्याने सामोरे जात स्वतःची क्षमता ओळखून पुढे येण्याचे आवाहन केले. महिलांनी राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रियांनी एकमेकींना पाठबळ दिल्यास कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या न्यू होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा या मनोरंजक स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी वरोरा नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे, कवयित्री सुनीता धोटे, डॉ. मृणाली निंबाळकर, नुपूर तापाले आणि वाडके यांचा समावेश होता.
या सोहळ्याला प्रदेश महिला महासचिव तथा नगरसेविका सुनंदा धोबे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष लहामंगे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, प्रवीण काकडे, जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुंदा जेनेकर, यवतमाळ महिला जिल्हाध्यक्षा वंदना आवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, नगरसेविका संगीता भोयर, वैशाली महाडोळे, सईदा शेख, मनीषा बोबडे, प्रतीक्षा येरगुडे तसेच नगरसेवक सुरेंद्र अडबाले, राहुल चौधरी, रामनरेश यादव यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंदाताई जेनेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी खोब्रागडे यांनी मानले.
News - Chandrapur




Petrol Price




