गडचिरोली : बांधकामाधीन पुलाजवळ भीषण अपघात : एका युवकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली–धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील बोथली गावाजवळ बांधकामाधीन पुलाजवळ सुरक्षेच्या गंभीर त्रुटींमुळे भीषण अपघात घडून एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास धानोरा येथून गडचिरोलीकडे दुचाकीने येत असताना बोथली गावाजवळील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ अचानक अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक संकेत सिडाम याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला सिडाम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी पाहणी केल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असतानाही आवश्यक सुरक्षा उपाययोजना, इशारा फलक, बॅरिकेड्स किंवा पुरेशी प्रकाशयोजना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना वारंवार घडत असून यापूर्वीही या मार्गावर अनेक अपघात झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, तसेच मृत युवकाच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या अभावामुळे महामार्गावरील कामे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची टीका होत असून प्रशासन आता तरी जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




