महत्वाच्या बातम्या

 ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दिव्यांग विद्यार्थ्यांची निसर्गभ्रमंती : चला माझ्या ताडोबाला उपक्रम


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चला माझ्या ताडोबाला या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट बौद्धिक दिव्यांग मुला-मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ताडोबा जंगलाची सफर घडविण्यात आली. १३ मार्च रोजी आयोजित या निसर्गभ्रमंतीत शाळेतील २० विद्यार्थी व २० शिक्षकांनी सहभाग नोंदवत जंगलातील वातावरणाचा अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे, वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि प्रत्यक्ष जंगलभेटीद्वारे निसर्गाशी जवळीक निर्माण करणे हा चला माझ्या ताडोबाला उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जंगलभ्रमंतीसह निसर्ग शिक्षण, संवादात्मक उपक्रम आणि वन्यजीवांविषयी माहिती देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ वन्यजीव पाहण्याचा अनुभवच नव्हे तर पर्यावरण संवर्धनातील स्वतःची भूमिका समजून घेण्याची संधी मिळते.

उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी दोन विशेष मोबाईल पर्यावरण शिक्षण वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक माहिती दिली जाते. चालू शैक्षणिक वर्षात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून ताडोबाला भेट दिली आहे.

मागील तीन शैक्षणिक वर्षांत चला माझ्या ताडोबाला उपक्रमाने ४४२ शाळांपर्यंत पोहोचत १४ हजार ५५२ विद्यार्थ्यांपर्यंत व शिक्षकांपर्यंत संवर्धनाचा संदेश पोहोचविला आहे. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग राहिला आहे.

दरम्यान, ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत बफर व कॉरिडॉर परिसरातील १३१ शाळांमधील ३,१९६ विद्यार्थी आणि २४८ शिक्षकांनी ताडोबा भेट देत निसर्गभ्रमंतीचा अनुभव घेतला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांनी सांगितले की, २०१५ पासून सुरू असलेला हा उपक्रम जंगल आणि स्थानिक समाज यांच्यातील दुवा ठरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या नैसर्गिक वारशाबद्दल अभिमान आणि संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होत आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या सहकार्याने हा उपक्रम ताडोबा तसेच कन्हारगाव, घोडाझरी आणि चपराळा वन्यजीव अभयारण्यांना जोडणाऱ्या कॉरिडॉर परिसरातील शाळांपर्यंत विस्तारण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos