महत्वाच्या बातम्या

 महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वरील नैनपुर-डुग्गीपार जवळील एक्वा पार्कसमोर रविवारी २२ मध्यरात्री सुमारे १.३० वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. मृत बिबट्याचे वय अंदाजे दोन वर्षे असल्याची प्राथमिक माहिती वन विभागाने दिली आहे.

या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नवेगाव व्याघ्र प्रकल्प क्षेत्र पसरलेले आहे. त्यामुळे या मार्गावरून वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात अवागमन सुरू असते. विशेषतः रात्रीच्या वेळी वन्यप्राणी रस्ता ओलांडताना वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. परिणामी, अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत असून ही चिंतेची बाब बनली आहे.

रविवारी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच सहायक उपवनसंरक्षक सचिन डोंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, वनरक्षक प्रदीप हत्तीमारे, दामिनी लांजेवार व दिगंबर भेंडारकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचा पंचनामा करून मृतदेह रात्रीच कोहमारा येथील वनक्षेत्र सहायक कार्यालयात आणण्यात आला.

सोमवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उत्तरीय तपासणी (पोस्टमार्टेम) करण्यात आली. त्यानंतर डोंगरगाव डेपो येथे वनविभागाच्या उपस्थितीत मृत बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गालगत वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वेगमर्यादा कठोरपणे अंमलात आणणे, इशारा फलक उभारणे तसेच वन्यप्राण्यांसाठी अंडरपासची सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे. वन्यजीवांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





  Print






News - Gondia




Related Photos