वैनगंगा नदी पुलावर भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर आज शनिवारी २४ पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्दैवी घटनेमुळे देव्हाडा परिसरात शोककळा पसरली असून एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल खोब्रागडे (वय २६, रा. देव्हाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमोल हा सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास तो आपल्या दुचाकीने देव्हाडाहून तुमसरच्या दिशेने जात होता. यावेळी माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अमोलचा जागीच मृत्यू झाला.
अज्ञात वाहनाचा शोध सुरू -
अपघात घडल्यानंतर धडक देणारा वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या वाहनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.
तासाभरात दुसराही अपघात -
या अपघातानंतर अवघ्या तासाभरातच त्याच वाहनाने आणखी एक अपघात केल्याची माहिती समोर आली आहे. पुलावर दुचाकीस्वाराचा बळी घेतल्यानंतर वाहनचालकाने ट्रक न थांबवता रामटेकच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला. मोहाडी तालुक्यातील काटेबाम्हणी गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मॅगनीज भरलेल्या दुसऱ्या ट्रकला त्याने मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने या दुसऱ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका -
पहाटेच्या वेळेस वाळू वाहतूक करणारे ट्रक तसेच अदानी प्रकल्पातील कोळसा वाहतूक करणारी अवजड वाहने मोठ्या वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असून प्रशासनाने तत्काळ कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हृदयद्रावक परिस्थिती -
मृत अमोल खोब्रागडे हा विवाहित असून त्याला अवघी तीन महिन्यांची चिमुकली मुलगी आहे. घरातील कर्ता पुरुष अकाली गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या पत्नीवर या घटनेने मोठा आघात झाला आहे.
News - Bhandara




Petrol Price




