पंजाबमधील पूरस्थिती भीषण : मृतांचा आकडा ५१ वर


- ३.८७ लाख लोक प्रभावित, १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / चंदीगड : पंजाबमधील पूरस्थिती अजूनही गंभीर स्वरूपाची आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, हवामान खात्याने आगामी काही दिवसांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांत आलेल्या पुराचे दुष्परिणाम अद्यापही तीव्र असून, मानसा, मोगा आणि पटियाला जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आणखी ३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला आहे.
पूरामुळे आतापर्यंत १५ जिल्ह्यांतील सुमारे ३.८७ लाख नागरिकांना फटका बसला आहे. याशिवाय, तब्बल १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. कृषी क्षेत्रासोबतच घरे, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांनाही मोठा धक्का बसला आहे.
शेतकऱ्यांसाठी मदत योजना -
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंजाब मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
प्रति एकर २० हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
जिसदा खेत, उसकी रेत योजना मंजूर करून, शेतकऱ्यांना शेतात साचलेली वाळू काढून विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे त्यांना आर्थिक नुकसान भरून काढण्यात मदत होईल.
धरणांवरील पाण्याची स्थिती -
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाण्याची पातळी काही प्रमाणात घटू लागल्याने परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
बियास नदीवरील पोंग धरणाची पातळी १,३९०.७४ फूट नोंदली गेली असून, एक दिवसापूर्वी ती १,३९२.२० फूट होती.
धरणातील पाण्याचा प्रवाह ३६,९६८ क्युसेकवरून घटून ३४,५८० क्युसेक झाला आहे.
भाक्रा धरणातील पाणी पातळ १,६७७.२ फुटांवर आली आहे.
अद्याप बेपत्ता नागरिक -
महसूल मंत्री हरदीप सिंग मुंडियां यांनी सांगितले की, १ लाक ८४ हजार ९३८ हेक्टरवरील पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. घरं आणि पशुधनाच्या नुकसानीचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे आणि पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण तपशील समोर येईल. दरम्यान, पठाणकोट जिल्ह्यात अजूनही ३ नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, या पुराचा परिणाम केवळ कृषी उत्पादनावरच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही दीर्घकाळ जाणवणार आहे.
News - World




Petrol Price




