महत्वाच्या बातम्या

 गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा : धापेवाडा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. हवामान विभागाने आगामी दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे सर्व २३ दरवाजे मंगळवारी (८) दुपारी उघडण्यात आले, व बॅरेजमधून प्रत्येकी १ लाख ८३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने धरण प्रशासनाला पाण्याचा विसर्ग करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा -
वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः तिरोडा, आमगाव, गोंदिया तालुक्यांतील नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन यंत्रणा सज्ज -
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल विभाग व स्थानिक पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, संभाव्य पूरस्थितीशी मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेती व दैनंदिन जीवनावर परिणाम -
या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकरी संकटात सापडले असून, काही पिकांचे नुकसान झाल्याचीही प्राथमिक माहिती मिळत आहे. रस्ते व दळणवळणावरही पावसाचा परिणाम होत आहे. काही ठिकाणी लहान पुलांवरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन -
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर अजून दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि आपली सुरक्षा प्राथमिक मानावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos