सडक अर्जुनीत दुर्दैवी अपघात : धावत्या कारवर झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू, तिघे जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील आराम मशीनसमोरील रस्त्यावर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. रस्त्यालगतचे एक जुने झाड अचानक धावत्या कारवर कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये वासुदेव खेडकर (५७) व आनंदराव राऊत (४५) दोघेही रा. सडक अर्जुनी यांचा समावेश आहे. तर रितीक दिघोरे (२२, रा. सडक अर्जुनी), राजू चौरागडे आणि अनिल चौधरी हे तिघे जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सकाळी वासुदेव खेडकर, आनंदराव राऊत आणि रितीक दिघोरे हे एमएच ३१ सीआर १५४९ क्रमांकाच्या कारने उमझरी मध्यम प्रकल्प येथे मासेमारीसाठी निघाले होते. त्यांनी शहरातील पेट्रोल पंपावर इंधन भरून पुढे मार्गक्रमण सुरू केले असता, आराम मशीन समोरील रस्त्यावर अचानक रस्त्यालगत असलेले एक मोठे चिचव्या झाड त्यांच्या कारवर कोसळले. झाड इतक्या जोरात कोसळले की कारचा अक्षरश: चुराडा झाला. यामध्ये वासुदेव खेडकर आणि आनंदराव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक रितीक दिघोरे गंभीर जखमी झाला.
याच दरम्यान गोंदियाहून नागपूरकडे जात असलेल्या इनोव्हा वाहन (एमएच ३१ एफव्ही ७३४१) वरही झाडाची एक मोठी फांदी कोसळली. या वाहनात प्रवास करणारे राजू रूपलाल चौरागडे (४६) व अनिल रामकृष्ण चौधरी (रा. गोंदिया) हे दोघेही जखमी झाले. त्यांच्या गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारमधील जखमींना बाहेर काढले. लगेचच १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून सर्व जखमींना गोंदियातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे झाड कोसळल्याचा अंदाज -
सडक अर्जुनी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. रस्त्यालगत असलेली अनेक जुनी झाडे यामुळे कमकुवत झाली असून, आज कोसळलेले चिचव्या झाडदेखील अंदाजे २० ते २५ वर्षे जुने होते. या झाडाच्या कोसळण्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
News - Gondia




Petrol Price




