भंडाऱ्यात १ सप्टेंबरपासून मोफत मोटर रिवाइंडिंग प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या वतीने १ सप्टेंबर २०२६ पासून ३० दिवसीय मोफत मोटर रिवाइंडिंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये विद्युत उपकरणांची मूलभूत माहिती, विद्युत दुरुस्ती करताना घ्यावयाची सुरक्षितता, प्रतिरोध, वाहक, विद्युतरोधक व अर्धवाहक, मोटर रिवाइंडिंगसाठी आवश्यक साधने व उपकरणे, व्होल्टमीटर व ॲमीटरची जोडणी, श्रेणी व समांतर जोडणी, स्विचेस, पॅनेल बोर्ड वायरिंग, इलेक्ट्रिक मोटरमधील ध्रुव प्रणाली, कॉइलचे विभाजन, मोटरमधील स्लॉट व पिचचे प्रकार आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच टेबल फॅन वायंडिंग, सीलिंग फॅन, सिम्पल पोल मोटर, कूलर फॅन, टेस्टिंग बोर्डची तयारी आणि वायंडिंग डेटा याबाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी १८ ते ५० वर्षे वयोगटातील, दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण आणि स्वयंरोजगाराची आवड व व्यवसाय करण्याची तयारी असलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना जेवण, चहा, नाश्ता, वही, पुस्तके तसेच राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण प्रवेशासाठीच्या मुलाखतीस येताना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधारकार्ड व मनरेगा जॉब कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता बी.ओ.आय. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, लालबहादूर शास्त्री मनरो शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या संचालक मंगल निमजे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९५११८७५९०८, ८६६९०२८४३३, ९७६६५२२९८४, यांच्याशी संपर्क साधावा.




Petrol Price




