महत्वाच्या बातम्या

 थकीत कोरोना भत्त्यासाठी घुग्घुसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा दोन वर्षांचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळालेला नाही. तब्बल २३ हजार रुपयांचा हा भत्ता तातडीने अदा करण्यात यावा, या मागणीसाठी घुग्घुस येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २३ नोव्हेंबरपासून नगर परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत थकीत भत्त्याबाबत लेखी निर्णय होत नाही आणि प्रत्यक्ष पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोरोना महामारीच्या काळात महामारी नियंत्रण आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, गटप्रवर्तक आणि स्त्री परिचर यांच्याकडून दोन वर्षे काम करून घेण्यात आले. या कामाच्या मोबदल्यात दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, काम करूनही संबंधित कर्मचाऱ्यांना अद्याप हा भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, आपल्या हक्काच्या पैशांसाठी त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

या आंदोलनादरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रंजनकर यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. संबंधित अहवाल तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी, नगरसेवक नरुल सिद्दिकी आणि कार्यकर्ते रोशन दंतलवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच निवेदन स्वीकारून कोरोना भत्त्यासाठी आलेल्या राखीव निधीतून थकीत रक्कम अदा करण्याबाबत आश्वासन दिले. येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या आमसभेत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान न मानता लेखी निर्णय आणि प्रत्यक्ष थकीत रक्कम मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला. आंदोलनस्थळी थकीत कोरोना भत्ता २३ हजार रुपये मिळालाच पाहिजे, कोरोना भत्ता आमच्या हक्काचा आहे, कामगार एकजुटीचा विजय असो आणि लाल बावट्याचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे नेतृत्व व मार्गदर्शन सीटूचे जिल्हा महासचिव अरुण भेलके आणि अंगणवाडी संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्ष शारदा लेनगुरे यांनी केले. आंदोलनाचे संचालन उर्मिला लिहितकर यांनी केले. अर्चना बेहेरे यांनी प्रास्ताविक, तर मंजुषा ठाकरे यांनी आभार प्रदर्शन केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी अल्का टोंगे, पूजा गावंडे, आशा उरकुडे, सुनीता पाटील, वैशाली कांबळे, स्मिता डंभारे, कविता निकुरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





  Print






Related Photos