हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या : मुख्यमंत्री फडणवीस

- कवडक येथे कृषी महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण; कृषी संशोधन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाच्या विकासावर मान्यवरांचा भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसमोर नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी कृषी संशोधन, प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती, नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासोबतच हवामानाचा ताण सहन करणारी पिके निर्माण करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी दर्जेदार कृषी महाविद्यालयांची निर्मितीही महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रामटेक तालुक्यातील कवडक येथे दत्ता मेघे फाऊंडेशन, नागपूरद्वारा संचालित स्व. दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शालिनीताई मेघे, आमदार समीर मेघे, सागर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबीय आणि शिक्षण, आरोग्य व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यंदा अल निनोचा प्रभाव आणि पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाचा ताण सहन करणारी तसेच कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी पिके विकसित करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोग झाला पाहिजे. कृषी क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधन केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधन आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतीसोबतच पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. देशी गाईंचे महत्त्व केवळ दूध उत्पादनापुरते मर्यादित नसून संपूर्ण कृषी परिसंस्थेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन, पशुधनासाठी आधुनिक उपचारपद्धती आणि संशोधनाच्या माध्यमातून पशुपालकांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांमुळे पशुसंवर्धन क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेघे फाऊंडेशनच्या माध्यमातून रामटेकमध्ये उभारण्यात आलेले कृषी महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय रुग्णालय हे ग्रामीण भागातील कृषी संशोधन, पशुसंवर्धन आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे ठरतील. या संस्थांमुळे रामटेकच्या विकासाला महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जगाला विकासाचा नवा मार्ग दाखवायला हवा : डॉ. मोहन भागवत -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या मार्गदर्शनात निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परावलंबित्व अधोरेखित केले. निसर्गासह आपण सर्व एकाच विश्वाचे घटक आहोत, त्याचे मालक नाही. त्यामुळे आपण एकमेकांवर अवलंबून असून, केवळ स्वतःच्या हिताचा विचार न करता सर्वांच्या जीवनाचा आणि कल्याणाचा विचार करणारी जीवनदृष्टी असायला हवी. त्यासाठी माणसाने स्वतःच्या जीवनावर काही संयम राखणे आवश्यक आहे. आजच्या जगाला विकासाचा नवा मार्ग दाखविण्याची गरज असून, संपूर्ण विश्व त्या दृष्टीने भारताकडे पाहत आहे. आपल्या विकासातून जगाचाही विकास झाला पाहिजे, असा विचार प्रत्येक राष्ट्राने करायला हवा, असे डॉ. भागवत म्हणाले.
देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्याची गरज : नितीन गडकरी -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी असलेल्या संधींकडे लक्ष वेधले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भात दुग्धव्यवसायाला चालना देण्याचे काम सुरू असून, एक हजार कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. कोल्हापूरच्या तुलनेत संपूर्ण विदर्भातील दूध उत्पादन कमी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि पशुसंवर्धन हे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत ठरू शकतात. शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून पशुपालकांना आधुनिक उपचारपद्धती आणि तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध होतील. स्व. दत्ता मेघे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय असून, रामटेकमध्ये पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचे त्यांचे स्वप्न मेघे कुटुंबीयांनी पूर्णत्वास नेले आहे, असे गडकरी म्हणाले.
कृषी महाविद्यालयामुळे प्रगतीचे नवे दालन खुले होणार ॲड. आशिष जयस्वाल -
कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मेघे कुटुंबीयांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. स्व. दत्ताभाऊ मेघे यांनी नागपूर आणि वर्धा येथे शैक्षणिक संस्था उभारून हजारो डॉक्टर आणि अभियंते घडविले आहेत. आता तंत्रज्ञानासोबतच कृषी आणि पशुधन क्षेत्रातही मेघे कुटुंबाने पुढाकार घेतला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सागर आणि समीर मेघे हे स्व. दत्ताभाऊंचे रामटेकच्या विकासाचे स्वप्न निश्चितच पूर्ण करतील. कृषी महाविद्यालयामुळे भविष्यात प्रगतीचे नवे दालन खुले होणार असून, मेघे कुटुंबीयांचे हे कार्य रामटेकवासीय विसरणार नाहीत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी नेहरू बालसदनच्या चमूने महाराष्ट्र गीत सादर केले. सागर मेघे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर आमदार समीर मेघे यांनी आभार मानले.




Petrol Price




