महत्वाच्या बातम्या

 तीन शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या वाघाची दहशत कायम : सिंदेवाहीत महापिंजऱ्याचा प्रयोग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतात कष्ट करणाऱ्या तीन शेतकऱ्यांचे आयुष्य वाघाच्या हल्ल्याने हिरावून घेतले. कुणाचा संसार उद्ध्वस्त झाला, तर कुणाच्या कुटुंबाचा आधार कायमचा हरपला. सिंदेवाही तालुक्यातील या रक्तरंजित घटनांनंतरही वाघाची दहशत संपलेली नाही. शेतात जाण्यासाठीही आता शेतकरी धजावत नसताना वनविभागाने या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सावलीत यशस्वी ठरलेल्या ३० बाय ३० फुटांच्या महाकाय पिंजऱ्याचा प्रयोग आता सिंदेवाहीत करण्यात येत आहे.

२४ ऑक्टोबरला पलसगाव जाट येथील नानाजी नारायण कामडी (६०) यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा जीव घेतला. या घटनेचे दुःख ताजे असतानाच २५ ऑक्टोबरला भेंडाळा (खातगाव) परिसरातील महिला शेतकरी प्रेमिला बंडू महाडोरे (५५) यांना वाघाने आपले लक्ष्य केले. त्यानंतर ३० ऑक्टोबरला नवरगाव उपवनक्षेत्रातील घुम्मनखेडा परिसरात शेतात काम करणारे पत्रुजी रामाजी मेश्राम (६५) यांचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांत तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनांनी संपूर्ण परिसर हादरला असून शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. सावली तालुक्यात तीन गुराख्यांचा बळी घेणाऱ्या टी-१२२ वाघाला २४ ऑक्टोबरला ३० बाय ३० फुटांच्या महाकाय पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले होते. या प्रयोगाला मिळालेल्या यशानंतर आता सिंदेवाहीतही त्याच पद्धतीचा वापर केला जात आहे. पिंजऱ्यात आमिष म्हणून जनावर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत देखरेख ठेवली जात आहे. तीन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या वाघाला पकडून आणखी एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू नये, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.

उंच पिकांच्या आड लपला मृत्यूचा सापळा! -
वाघाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. मात्र, परिसरातील धानाची शेती, पाच फुटांपेक्षा अधिक उंच वाढलेली तुरीची पिके आणि काही ठिकाणी असलेली उसाची शेती वनविभागासाठी मोठी अडचण ठरत आहे. दाट पिकांमध्ये वाघ लपून बसत असल्याने ड्रोनच्या माध्यमातूनही त्याचे अचूक स्थान शोधणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाघाला पकडण्याची मोहीम अपेक्षित यश मिळवू शकलेली नाही.

वाघाच्या हालचालीची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी होत असल्याने बचाव मोहिमेत आणखी अडथळे निर्माण होत आहेत. वनविभागाने नागरिकांना वाघ दिसल्यास गर्दी न करता तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, वनविभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र जंगल आणि शेतशिवार पिंजून काढत आहेत.

तीन कुटुंबांचे आधार हिरावून घेणाऱ्या या वाघामुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे जगणे भयभीत झाले आहे. शेतात जायचे तरी कसे, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला सतावत आहे. आता महापिंजऱ्याच्या प्रयोगाला यश मिळावे आणि आणखी कोणत्याही निष्पाप जीवाचा बळी जाऊ नये, हीच सिंदेवाहीतील नागरिकांची अपेक्षा आहे.





  Print






Related Photos