महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत लाखनी येथे ३ नोव्हेंबरला लोक अदालत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने व सामंजस्याने निपटारा करण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लाखनी तालुक्यातील महसुली प्रकरणांसाठी तहसील कार्यालय, लाखनी येथे ३ नोव्हेंबर २०२६ आणि १५ डिसेंबर २०२६ रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोक अदालतीमध्ये मंडळ अधिकारी स्तरावरील फेरफार नोंदीविषयक प्रकरणे, नायब तहसीलदार व तहसीलदार स्तरावरील महाराष्ट्र जमीन महसूल संहितेंतर्गत महसुली रस्त्यांसंबंधी दावे, मामलेदार न्यायालय अधिनियमाच्या कलम ५ अंतर्गत रस्ता विवाद, अन्य अर्धन्यायिक महसुली प्रकरणे, अपील प्रकरणे तसेच विविध प्रलंबित महसुली दावे व अपीलांचा समावेश करण्यात येणार आहे.
तडजोडीस तयार असलेल्या दोन्ही पक्षकारांनी स्वत किंवा वकिलामार्फत विहित नमुन्यातील प्रपत्र-अ (तडजोडनामा अर्ज) भरून दाखल करणे आवश्यक आहे. अर्जाचा विहित नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोक अदालतीच्या निश्चित तारखेला परस्पर संमती झालेल्या प्रकरणांमध्ये तात्काळ अंतिम आदेश पारित करून संबंधित दाव्यांचा कायमस्वरूपी निपटारा करण्यात येणार आहे.तरी लाखनी तालुक्यातील संबंधित पक्षकारांनी या अभियानाचा लाभ घेऊन आपली प्रलंबित महसुली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन तहसीलदार, लाखनी शीतल घावटे यांनी केले आहे.




Petrol Price




