महत्वाच्या बातम्या

 नेपाळमध्ये महापूर : भंडारा जिल्ह्यातील अडकलेल्या पर्यटकांची माहिती देण्याचे आवाहन


- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हेल्पलाइन क्रमांक जाहीर; नागरिकांनी तातडीने माहिती देण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या महापूरस्थितीमुळे मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळत आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतातील काही पर्यटकही नेपाळमध्ये अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नेपाळमध्ये अडकलेल्या आपल्या नातेवाईक व परिचितांची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे.

भंडारा जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये आहेत आणि महापूरस्थितीमुळे अडकले आहेत, तसेच आपल्या ओळखीतील, नातेवाईक किंवा अन्य कोणतीही व्यक्ती नेपाळमध्ये अडकली असल्याची माहिती असल्यास संबंधितांनी विलंब न करता जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची हेल्पलाइन -
अडकलेल्या नागरिक आणि पर्यटकांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा यांच्याकडून संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेल्पलाइन क्रमांक : ९७६७९६८१६६
हा संपर्क क्रमांक फक्त भंडारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अडकलेल्या व्यक्तीची सविस्तर माहिती द्यावी -
नेपाळमध्ये अडकलेल्या व्यक्तीबाबत प्रशासनाला माहिती देताना संबंधित व्यक्तीची शक्य तितकी अचूक माहिती देणे आवश्यक आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास देण्यात यावा. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर आपत्तीग्रस्त भागातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे प्रशासनाला सुलभ होणार आहे.

घाबरून न जाता प्रशासनाला माहिती द्या -
नेपाळमधील महापूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधावा. नेपाळमध्ये अडकलेल्या आपल्या नातेवाईक, परिचित किंवा इतर व्यक्तीबाबत माहिती असल्यास ती तातडीने जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्तीग्रस्त भागातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहेत. त्यामुळे अडकलेल्या व्यक्तींची माहिती वेळेत उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.





  Print






Related Photos