महत्वाच्या बातम्या

 गणरायाच्या आगमनासाठी चंद्रपूर सज्ज : १५ हजार ८८५ ठिकाणी होणार स्थापना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली असून, १४ सप्टेंबरपासून जिल्ह्यात दहा दिवसीय गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ होत आहे. घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींच्या स्थापनेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात तब्बल १५ हजार ८८५ ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना होणार असून, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तब्बल ३ हजार ५०० पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि सुरक्षा जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात यंदा १३ हजार ४५५ घरगुती, १ हजार ९९९ सार्वजनिक आणि ४३१ ठिकाणी ‘एक गाव-एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशमूर्तींची स्थापना केली जाणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत वातावरण भक्तिमय झाले असून, सार्वजनिक गणेश मंडळांचे आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई आणि प्रवेशद्वारांनी शहराचे रूप पालटले आहे.

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणेशमूर्ती मंडपात नेण्यासाठी मंडळांची लगबग सुरू होती. घरगुती गणेशमूर्तींच्या खरेदीसाठीही नागरिकांची मोठी गर्दी झाली. पूजासाहित्य, फुले, सजावटीच्या वस्तू आणि इतर साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये दिवसभर गर्दी होती. वाढलेल्या गर्दीमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील संवेदनशील तसेच प्रमुख चौकांवर विशेष बंदोबस्त ठेवला आहे. गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका, तुकूम, बंगाली कॅम्प, भिवापूर, बागला चौक आणि अंचलेश्वर गेट आदी ठिकाणी पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त आखला आहे. यामध्ये एक पोलीस अधीक्षक, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सात डीवायएसपी, २५ ठाणेदार, १७० एपीआय-पीएसआय, दोन हजारांहून अधिक पोलीस अमलदार आणि सुमारे एक हजार होमगार्ड यांचा समावेश आहे. त्याचबरोबर एसआरपीएफच्या दोन प्लाटून, क्यूआरटी आणि आरसीपी पथके देखील बंदोबस्तात राहणार आहेत.

सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलीस व प्रशासनाने केले आहे. दहा दिवसांच्या उत्सवानंतर २५ सप्टेंबर रोजी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.





  Print






Related Photos