महत्वाच्या बातम्या

 वर्ध्यात म्युझियम ऑन व्हील्स फिरत्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


- २० हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी अनुभवला प्राचीन जागतिक इतिहास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : इतिहास हा केवळ पुस्तकांच्या पानांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता यावा, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित म्युझियम ऑन व्हील्स या फिरत्या प्रदर्शनाला जिल्ह्यात अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

जर तुम्ही संग्रहालयापर्यंत पोहोचू शकत नसाल, तर संग्रहालय तुमच्या दारी येईल या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा लाभ आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २० हजार विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी घेतला आहे. यावर्षीचे प्रदर्शन भूतकाळातील जाळे भारत आणि प्राचीन जग या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे.

एका विशेष व अत्याधुनिक सुविधेने सुसज्ज असलेल्या मोठ्या बसमध्ये हे संपूर्ण प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात जगातील प्राचीन संस्कृतींचा इतिहास मांडण्यात आला असून त्यात प्रामुख्याने प्राचीन संस्कृतींचा संगम यामध्ये सिंधू-सरस्वती, चीन, मेसोपोटेमिया आणि प्राचीन इजिप्त या महान संस्कृतींमधील परस्पर संबंध, जीवनशैली व व्यापार पद्धतींची माहिती रंजक प्रतिकृतींद्वारे देण्यात आली आहे.

सांस्कृतिक व व्यापारी देवाणघेवाण यामध्ये हजारो वर्षांपूर्वी मानवाचे झालेले स्थलांतर, नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार, वस्तूंचा विनिमय आणि विविध संस्कृतींवर पडलेला एकमेकांचा प्रभाव यांचे सविस्तर दर्शन येथे घडते. भारताचे जागतिक योगदान यामध्ये प्राचीन जागतिक व्यापारी व सांस्कृतिक जाळ्यामध्ये भारताचे स्थान किती महत्त्वपूर्ण आणि समृद्ध होते, याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळते.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या नियोजनानुसार १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत हे फिरते प्रदर्शन जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नेण्यात आले.  या उपक्रमांतर्गत सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी आणि वर्धा या सर्व प्रमुख तालुक्यांमधील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रदर्शन थेट पोहोचवण्यात आले. विविध तालुक्यांमध्ये स्थानिक समन्वयकांच्या माध्यमातून शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले असून २२ ऑगस्ट रोजी वर्धा शहरात या शैक्षणिक दौऱ्याचा समारोप होईल.

प्रदर्शनाद्वारे पाठ्यपुस्तकातील इतिहास प्रत्यक्ष प्रतिकृती, माहिती फलक आणि दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून डोळ्यांसमोर उभा राहिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल प्रचंड उत्सुकता, आवड आणि कुतूहल निर्माण झाले आहे. इतिहास आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, विशेषत विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. जिल्ह्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह अत्यंत कौतुकास्पद आहे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  डॉ. मंगेश घोगरे यांनी सांगितले.

                                            





  Print






Related Photos