भद्रावतीतील घरफोडीचा पर्दाफाश : तिघे आरोपी जेरबंद, ३ लाखांचा सोन्याचा ऐवज जप्त; एलसीबी ची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ४ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सौ. अंकिता पडधरीया, रा. भद्रावती यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचे पती व भाऊ बाहेरगावी गेले असल्याने त्या ८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता नातेवाईकांकडे मुक्कामी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आलमारीचेही कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. ७४४/२०२६, कलम ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग वरोरा पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा माग काढला. या कारवाईत अतुल विकास राणा २७ वर्षे, रा. बंगाली कॅम्प, शामनगर, चंद्रपूर, अथर्व सुभाष रामटेके २१ वर्षे, रा. पंचशील चौक, चंद्रपूर आणि अनिकेत मनोज मेंढे १८ वर्षे, रा. पंचशील चौक, चंद्रपूर यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून सोन्याची अंगठी, सोन्याचा गोप आणि सोन्याची लगड असा अंदाजे ३ लाख ४ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील तनवीर बेग, रा. चंद्रपूर हा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग वरोरा पथकाने केली असून, प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




