बिबट्याच्या भीतीने दहशत : ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले रानमांजर देलनवाडी परिसरातील अफवांना पूर्णविराम, वन विभागाचे नागरिकांना आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ब्रह्मपुरी : शहरातील देलनवाडी वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाने बसविलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांतील चित्रफिती तपासल्यानंतर बिबट्या नसून जंगल कॅट अर्थात रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरातील बिबट्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
चार दिवसांपूर्वी देलनवाडी परिसरातील रहिवासी बावनकुबे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये घुसून एका वन्यप्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा सुरू झाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वन विभागाने गस्त वाढविण्यासह वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बावनकुबे यांना परिसरात बिबट्यासारखा प्राणी दिसल्याचा संशय आला. त्यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार यांना माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक चुनरे यांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रॅप कॅमेऱ्यांतील चित्रफितींची तपासणी केली. तपासणीत कॅमेऱ्यात बिबट्या नसून रानमांजर कैद झाल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर वन विभागाने संबंधित छायाचित्रे नागरिकांना दाखवून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता कोणताही वन्यप्राणी आढळल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




